मुंबईत गेल्या सहा वर्षांत बांधकामांच्या मलब्याखाली २४९ जणांनी गमावले प्राण

गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल ३३२३ इमारतींचे भाग कोसळून किवा भिंती कोसळून जवळपास २४९ जणांचा बळी गेलाय

Updated: Jul 3, 2019, 07:49 PM IST
मुंबईत गेल्या सहा वर्षांत बांधकामांच्या मलब्याखाली २४९ जणांनी गमावले प्राण  title=

मुंबई : मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे २४ जणांचा मृत्यू झाला. आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल ३३२३ इमारतींचे भाग कोसळून किवा भिंती कोसळून जवळपास २४९ जणांचा बळी गेलाय. तर तब्बल ९१९ जण जखमी झाल्याचं समोर येतंय. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून ही माहिती मिळवलीय.  

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला २०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत? तसेच दुर्घटनेतील मृत्यू आणि जखमींची आकडेवारी मागितली होती. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांना माहिती अधिकार अधिनियम - २००५ अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ३३२३ घर / घरांचे भाग /  भिंती / इमारती /  इमारतींचे भाग कोसळणची घटना झाली आहे. तसंच एकूण २४९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण ९१९ लोक दुर्घटनेत जखमी झाले आहे.

वर्षाप्रमाणे आकडेवारी!

२०१३ मध्ये एकूण ५३१ घर / घरांचे भाग /  भिंती / इमारती /  इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात एकूण १०१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण १८३ जण जखमी झाले असून त्यात ११० पुरुष आणि ७३ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये एकूण ३४३ घर / घरांचे भाग /  भिंती / इमारती /  इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. व एकूण २१ जणांनी आपले प्राण गमावले तर १०० जण जखमी झाले. मृतांत १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. 

२०१५ मध्ये एकूण ४१७ पडझडीच्या घटना घडल्या. यात १५ जणांचा बळी गेला तर १२० जण जखमी झाले.  मृतांत ११ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. 

२०१६ मध्ये एकूण ४८६ पडझडीच्या घटना घडल्या. यात एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७ पुरुष आणि ७ स्त्रियांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत १७२ लोक जखमी झाले.

२०१७ मध्ये एकूण ५६८ पडझडीच्या दुर्घटना घडल्या. यात ४४ पुरुष आणि २२ स्त्रियांसहीत एकूण ६६ जणांनी आपले प्राण गमावले. तर १६५ जख जखमी झाले. 

२०१८ मध्ये एकूण ६१९ पडझडीच्या दुर्घटना घडल्या. यात १२ पुरुष आणि ३ स्त्रियांसहीत १५ जणांचे बळी गेले तर ७९ जण जखमी झाले.   

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश वेळा घरं किंवा भिंती कोसळण्याच्या घटनांसाठी अवैध बांधकामं कारणीभूत आहेत.