Budget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला

वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या. 

Updated: Feb 1, 2020, 02:08 PM IST
Budget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला title=

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी कृषी, पायाभूत, भांडवली बाजार आणि प्राप्तीकरासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. मात्र, यानंतर भांडवली बाजार गडगडताना दिसला. भांडवली बाजाराचे  सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ६५० आणि १८७ अंकांनी खाली आले. 

या अर्थसंकल्पात पायाभूत आणि बांधकाम उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होणे अपेक्षित होते. तसेच वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या. 

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीही भांडवली बाजारात विशेष सकारात्मक वातावरण नव्हते. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १४० अंकांनी तर निफ्टी १२६.५० अंकांनी घसरला होता. आज स्थावर मालमत्ता, उत्पादन क्षेत्र, एफएमसीजी यासह कृषी आणि वित्त संस्था , बँकांच्या शेअरवर परिणाम दिसून आला. अर्थसंकल्पानंतर अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येतील, आणि बाजार उसळी घेईल, अशी आशा बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाली.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्राप्तीकराच्या दरांमध्ये लक्षणीय कपात झाली आहे. त्यानुसार पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. तर ५ लाख ते ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी या टप्प्यातील करदात्यांना २० टक्के कर भरावा लागत होता. 

याशिवाय, ७.५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना २० टक्क्यांऐवजी १५ टक्के इतका कर भरावा लागणार आहे. तर १० ते १२.५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी हा दर ३० टक्के इतका होता. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल.