अभियंता प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराची हॉटेलमध्ये आत्महत्या

Boyfriend commits suicide in hotel : अभियंता असणाऱ्या प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराने आपले बिंग फुटेल म्हणून बिहारमधील  मुझफरनगर  एका  हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  

Updated: Mar 7, 2022, 08:38 PM IST
अभियंता प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराची हॉटेलमध्ये आत्महत्या title=
संग्रहित छाया

प्रथमेश तावडे / वसई : Boyfriend commits suicide in hotel : अभियंता असणाऱ्या प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराने आपले बिंग फुटेल म्हणून बिहारमधील  मुझफरनगर  एका  हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन त्याचा माग काढलाआहे. (Boyfriend commits suicide in hotel in Bihar after killing engineer's girlfriend in Vasai)

वसईतील एका लॉजमध्ये सायली शहासने  या तरुणीची हत्या करून फरार झालेला तिचा प्रियकर सागर नाईक  याने मुझफरनगर येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वसईच्या वसंत नगरी येथे राहणार्‍या सागर नाईक (28) आणि सायली शहासने (26) या तरुणीचे प्रेमसंबंध होते. शनिवार 26 फेब्रुवारी रोजी तो सायलीला घेऊन वसईतील एका लॉजमध्ये आला होता. त्यावेळी त्याने सायलीच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून हत्या केली आणि फरार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

त्याने आपला मोबाईल बंद केला होता. त्याने बिहारमधील मुज्फरनगर येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी एक खोली घेतली होती. रविवारी रात्री या खोलीत त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. तो बिहारवरून सीमा ओलांडून नेपाळला जाण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती त्याच्या मोबाईलमधून मिळाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बिंग फुटेल म्हणून केली हत्या 

या  तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याची प्रेयसी सायली ही अभियंता होती आणि चांगल्या पगाराची नोकरी करत होती. सागर याने मेकॅनिकल अभियंता असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र तो प्रत्यक्षात अभियंता नव्हता. त्याच्या कुटुंबियांपासून देखील त्याने ही माहिती दडवून ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, सायलीने लग्नासाठी आग्रह धरला होता. तिची समजूत काढण्यासाठी त्याने जानेवारी 2019 मध्ये गपचूप मंदिरात लग्न केले होते. परंतु जाहीरपणे लग्न करण्यासाठी ती सतत सागरच्या मागे लागली होती. सागर अभियंता नसल्याने त्याला नोकरी नव्हती. त्यामुळे लग्न केले तर आपले बिंग फुटेल, अशी त्याला भीती होती. म्हणून त्याने सायलीची हत्या केली असावी, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.