मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालची (Arjun Rampal) लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा (Gabriella Demetriades) भाऊ अॅगिसिलाओस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) याच्याविरुद्ध काढलेला अटकेचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) रद्द केला आहे. विशेष म्हणजे हिंदी भाषेच्या वापरामुळे अर्जुन रामपालच्या मेव्हण्याला दिलासा मिळाला आहे.
आदेश रद्द करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) द्वारे डिमेट्रिएड्सवर अटकेचे कारण हिंदीत लिहिलं होतं. ही भाषा त्याच्यासाठी परकी होती. खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवलं की, "एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य हा एक अत्यंत मौल्यवान अधिकार आहे. ज्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे."
डेमेट्रिएड्स हा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) नागरिक असून त्याची मुंबई जवळील लोणावळ्यात झडती घेतली असता ऑक्टोबर 2020 मध्ये चरस आढळून आलं होतं. त्याला 18 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. अर्जुन रामपालच्या मेव्हण्याच्या वकीलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की, डिमेट्रिएड्स हा परदेशी नागरिक असल्याने त्यांना हिंदीचे ज्ञान नव्हते आणि त्यामुळे त्यांना हिंदी वाचता, लिहिता किंवा समजता येत नाही. अटकेचे कारण, म्हणजे कागदपत्रे हिंदीत होती. तरी डिमेट्रिएड्सला त्या कागदपत्रांवर सही करायला भाग पाडलं.
यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ज्या व्यक्तीला अटक केली जाते त्या व्यक्तीला समजेल अशा भाषेमध्ये अटकेचे कारण आणि इतर कागदपत्रे लिहिणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य हा एक अत्यंत मौल्यवान अधिकार आहे. ज्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
दरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद की डेमेट्रिएड्सला समजेल त्या भाषेत हिंदी दस्तऐवजांचे भाषांतर केले होते. मात्र कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे अशा शब्दात कोर्टने सरकारी वकिलांना ताकीद दिली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही केस सुरू होती.