मुंबई : मुंबईतील रस्त्यावर मद्यधुंद बीएमडब्ल्यू कारचालकाचा कहर पाहायला मिळाला. मुंबईत रे रोड आणि किडवई रोड परिसरात भरधाव वेगाने कार चालवत या कारचालकानं अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेत २ नागरिकही जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीएमडब्ल्यू कारचालकाचा मालक दोन दिवसांपूर्वी दुबईला गेलाय.
काल रात्री अकाराच्या सुमारास ही घटना समोर आली. रे रोडहून एक भरधाव बीएमडब्ल्यू वेगाने शिवडीच्या दिशेने आली. यातील ड्रायव्हर समोर दिसणाऱ्या सर्व गाड्यांना उडवत आल्याचं प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे. शिवडी गोडाऊनच्या भागात ही कार आत वळली. तिथून चालकाला पुढे रस्ता सापडेना. त्यामुळे कार त्याला तिथेच सोडावी लागली. कारच्या भरधाव वेगाने संभ्रमात पडलेले काहीजण त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचले होते. चालक गाडीतून उतरताच नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत चालकाला तात्काळ काळाचौकी पोलीस स्थानकात नेण्यात आलं.
मुंबईतील रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या या कारचालकाचा ४ किमीपर्यंत पाठलाग करुन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात. कार नियंत्रणाबाहेर गेली ? की चालक मद्यधुंद अवस्थेत होता? की यामध्ये आणखी कोणतं महत्त्वाचं कारण आहे याची चौकशी सुरू आहे. या कारचालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.