कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका एक झाड लावण्यासाठी तब्बल ५९ हजार रुपये खर्च करणार आहे. अशा ६ हजार झाडांसाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी पालिकेनं केली आहे. मियावाकी या जपानी पद्धतीनं कमी जागेत अधिकाधिक झाडे लावून घनदाट जंगल तयार करण्याची संकल्पना मुंबईत आणली जातंय. परंतु इतक्या खर्चिक वृक्षलागवडीवरून पालिका प्रशासनावर टीका होते आहे.
भाजप सरकार सत्तेत असताना राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला गेला होता. भाजप सत्तेतून पायउतार झाली असली तरी त्या योजनेचा भाग बनलेल्या मुंबई महापालिकेनं आता ५९७७ झाडे लावण्याचं ठरवलं आहे. परंतु ही झाडे पारंपारिक पद्धतीनं न लावता जपानच्या मियावाकी पद्धतीनं लावली जाणार आहेत. ज्यामुळं एक झाड लावण्यासाठी तब्बल ५९ हजार रुपयांचा खर्च होणार आहे.
मियावकी पद्धत जपानमध्ये विकसित झाली असून यात कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे लावून घनदाट जंगलाची निर्मिती केली जाते. पारंपारिक पद्धतीनं जंगल निर्माण करण्यास २०० हून अधिक वर्षे लागतात, परंतु मियावाकी पद्धतीत ते २० वर्षांमध्ये होते. यासाठी स्थानिक वृक्षांचाच विचार केला जातो. भारतात ३३ मियावाकी जंगले असून संपूर्ण जगभरात सुमारे ३ हजार मियावाकी जंगले आहेत.
मुंबई महापालिकेनं या मियावाकी पद्धतीनं झाडे लावण्यासाठी काही जागांची निवड केली असून त्यासाठी दोन कंत्राटदारांची नियुक्तीही केली आहे. परंतु या पद्धतीत खर्च अधिक असल्यानं स्थायी समितीनं प्रशासनाला प्रथम याचे सादरीकरण करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतरच हा प्रस्ताव पास करण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे.
अत्यंत खर्चिक अशा मियावाकी पद्धतीनं झाडे लावण्यास विरोधकांनी विरोध केला. मुंबईतील आहेत ती झाडे वाचवण्याचे काम पालिकेनं करावं, अशा प्रकारे मुंबईकरांचा पैसा खर्च करू नये, असं विरोधकांचं मत आहे.
मुंबई महापालिका ही जणू प्रयोगशाळाच बनली आहे. जगातील नवं आणि खर्चिक तंत्रज्ञान आणून त्याचा प्रयोग करण्याचा जणू विडाच इथल्या अधिका-यांनी उचलला आहे. ज्याचा भार मात्र पालिका तिजोरीला पेलावा लागतो आहे.