मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. घरगुती गणपतीचं आगमन आणि विसर्जनादरम्यान फक्त ५ जणांची परवानगी असावी, असे आदेश आहेत. तसंच आगमन आणि विसर्जनासाठी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना नेऊ नयेत, असे निर्देशही मुंबई महापालिकेने दिले आहेत. यासोबतच घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त असू नये, असे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याऐवजी धातू अथवा संगमरवराची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यावर भर द्या, असंही महापालिकेने म्हणलं आहे. गणपती मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
सार्वजनिक गणपती मंडळासाठी राज्य सरकारने याआधीच नियमावली जाहीर केली आहे. भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.
कोरोनाचे संकट असल्याने दिवसातून तीन वेळ गणेश मंडप निर्जंतुकीकरण करावेत आणि मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
- मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
-आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक.
-मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
-भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
-कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.