मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी

BMC Biometric Attendance: मुंबई पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती मागण्यात आली होती.

Pravin Dabholkar | Updated: Jan 24, 2024, 04:06 PM IST
मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी title=

BMC Biometric Attendance: मुंबई पालिकेसारख्या राज्याच्या मोठ्या यंत्रणेत कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेत यावे यासाठी बायोमेट्रिक पद्धती सुरु करण्यात आली. पण यातही बोगसगिरी होत असल्याचे उघड झाले आहे. कर्मचारी स्वत:सोबत दुसऱ्या कर्मचाऱ्याची हजेरी लावत असल्याचे समोर आले. तसेच अनेक विभागांनी तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी होत असून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीत पालिकेने याची कबुली दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या बायोमेट्रिक हजेरीचा घोळबाबत कारवाई करत कठोर उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती विचारली होती. पालिकेच्या मुख्यालय परिरक्षण खात्याने अनिल गलगली यांस सफाई कामगार रमेश सोळंखी, ज्योती घुगल आणि सुहास कासारे यांची माहिती उपलब्ध करुन दिली. 

सुहास कासारे याने स्वतःच्या हजेरीबरोबर रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल यांची हजेरी लावली. त्यावेळी रमेश सोळंखी आणि ज्योती घुगल हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बायोमेट्रिक यंत्राजवळ दिसून येत नव्हते. पालिकेने या तिघांना नोटीस दिली पण आजमितीला कोणतीही कारवाई केली नाही. 

याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही खात्याने अजून माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

पालिका मुख्यालय असो की अन्य पालिकेचे कार्यालय सर्वत्र असा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. या प्रकरणात कोणतीच कारवाई न झाल्याने असे प्रकार भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांस पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

बायोमेट्रिक हजेरी अत्याधुनिक यंत्रणा असली तरी याचा दुरुपयोग होत आहे आणि बोगस हजेरी लावली जात आहे. भविष्यात यात सुधारणा करत बोगसगिरी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर आणि कडक कारवाई केल्यास कोणीही चूक करणार नाही. तसेच जे अश्या प्रकरणात आढळून येतात त्यांसवर कारवाई करत त्याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी अनिल गलगली यांची आहे.