मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात येत आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे लक्ष लागलंय. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात झाल्यावर या थोडा गोंधळ झाला. अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचं बजेट मांडत असताना महापालिका सहआयुक्त रमेश पवार हे पाणी समजून सॅनिटायझर प्यायले.
सर्व अधिकाऱ्यांच्या समोर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्याच आल्या होत्या. या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा आकार पाण्याच्या बाटल्यांसारखाच होता. त्यामुळे अनवधानाने सहआयुक्तांनी सॅनिटायझरची बाटली उचलून पाणी पिण्याचा प्रयत्न केला.
मात्र तातडीने ही बाब लक्षात येताच ते बाजू जाऊन चुळा भरून पुन्हा येऊन बसले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांसमोर पाण्याच्या बाटल्या मांडण्यात आल्या.
या अर्थसंकल्पात कोरोना आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नसेल असा अंदाज आहे. कोविड संकटामुळे अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ २५ ते ३० टक्के महसूल जमा झालाय.
कोरोनामुळे याआधीच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डर यांना प्रिमियममध्ये सूट देण्यात आलीय. त्याच धर्तीवर मुंबईकरांना यावर्षी कोणतीही करवाढ केली जाणार नाही अशी शक्यता आहे.