अंकूर त्यागी, झी मीडिया, मुंबई : सिद्धीविनायकाचे भक्त असाल तर रक्तदान करा... रक्तदान केलंत तर तुम्हाला व्हीआयपी पास मिळेल आणि बाप्पाचं थेट दर्शन घेता येईल.
प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच दर्शन घेण्यासाठी देशाविदेशातून लाखो भाविक येतात. मात्र, सिद्धीविनायकाचं दर्शन म्हटलं की गर्दी, मोठी रांग यामुळे अनेकांना आपला विचार बदलावा लागतो. मात्र सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने यावर उपाय शोधलाय. मंदिर ट्रस्ट लवकरच रक्तदान शिबीर सुरू कऱणार आहे. जे इथे रक्तदान करतील त्यांना बाप्पाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळेल.
मुंबईतल्या अनेक रक्तपेढ्यात रक्ताची चणचण असते. लोकांमध्ये रक्तदानाविषयी असलेली उदासिनता याला कारणीभूत असल्याचं मंदिर प्रशासनाचं मत आहे. मात्र आता सिद्धीविनायक मंदिराने ही अनोखी शक्कल शोधून काढल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास सिद्धीविनायक ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी व्यक्त केलाय.
सुरूवातीला हे शिबीर मंदिर प्रांगणात आयोजित केलं जाईल. तिथे जमा झालेलं रक्त मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये आणि एखाद्या रक्तपेढीला पोहोचवलं जाईल. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीशी या संदर्भात करार करण्यात येऊ शकतो.