'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही यात काही बदल होणार नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. 

Updated: Aug 25, 2023, 08:45 PM IST
'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला title=

Black & White With Sunil Tatkare : रोहित पवार (Rohit Pawar) हे अजित पवारांची (Ajit Pawar) जागा घेण्यासाठी आक्रमकपणे टीका करत असल्याचा आरोप अजित पवार गटानं केलाय. रोहित पवारांनी नेत्यांवर टीका करताना सावधानतेनं वक्तव्य करावं असा वडीलकीचा सल्ला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलाय. झी 24 तासच्या ब्लँक अँड व्हाईट कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केलंय. 

रोहित पवारांना वडीलकीचा सल्ला
रोहित पवार अलिकडच्या काळात आकाश ठेंगणं झालंय अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे पहिलं पाऊल आहे, थोडं सावधानतेने करावं, असा वडीलकीच्या नात्याने त्यांना सल्ला आहे, आता ऐकायचं की नाही हे त्यांनी ठरवावं असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली?
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली आहे असा शब्दप्रयोग मी वापरणार नाही, सर्वोच्च न्यायालयच्या खंडपीठाचा निकाल, निवडणूक आयोगाचा निकाल आणि आम्ही सर्वांना सामुदायिक घेतलेला निर्णय याची कायदेशीर बाबी तपासणून आम्ही एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. 

'अजित पवार आमचे नेते'
अजित पवार आमचे नेते आहेत, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं होतं. यावरही सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुलाखतीत अजित पवार यांचा उल्लेख आमदार असा केला जातो. अजित पवार आता उपमुख्यमंत्री आहेत. गेले दीड महिना अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, आमदार म्हणून नाही. असं प्रत्युत्तर सुनीत तटकरे यांनी दिलंय. 

लोकसभेनंतर पवार एकत्र येणार?
लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पवार एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील तटकरे यांनी एका निर्णयाक राजकीय भूमिकेतलं हे वळण असल्याचं म्हटलं आहे. हे वळण एका काळापूरतं सिमित नाहीए. उद्याच्या राजकारणाचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर वेगळा विचार करण्याची गरज नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

ईडीच्या दबावामुळे नेते फुटले?
ज्या वेळेस एखादा निर्णय घेतला जातो, त्यावेळी टीका होत असते. माझ्यावरही वैयक्तित आरोप झाले, भूजबळांवर आरोप झाले. पण कोणत्याही गोष्टीला घाबरून हा निर्णय घेतलेला नाही, हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.