वसई : वसई विरार मधील घरगुती आणि अनेक आस्थापनांना अवाजवी वीजबिले आली असून ती महाराष्ट्र सरकारने माफ करावी यासाठी वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्यावतीने महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी माणिकपूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी रहदारीला अडथळा निर्माण होवू नये म्हणून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांकडे बोलावून निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यात वीज वितरण कंपन्याकडून सर्रास अवाजवी लादलेल्या बिलामुळे सर्वसामान्य नागरिक बेहाल असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगून वीजग्राहकांना शासनाकडून दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली. सरकारने वीजबिल माफ न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्यात महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीजबिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे उद्योगधंदे, कार्यालये बंद होती. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नव्हते. तीन महिने वीज बील घेऊ नये, अशी मागणी होत होती. त्याचवेळी सरासरी बिले पाठविताना ती अव्वाच्यासव्वा पाठविले गेली. महावितरण आणि खासगी वीज वितरक कंपन्यांकडून विजबिलाच्या माध्यमातून लूट करण्यात आली आहे, असा आरोप करत लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी मनसे आणि विरोधकांकडून केली जात आहे.