मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकलं नाही याचं खापर शिवसेनेवर फोडणं सर्वस्वी चुकीचं आहे. भाजपचं निवेदन चुकीचं आणि खेदजनक असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तसंच पन्नास-पन्नास टक्के मंत्रिपदं न देणं हा भाजपचा अहंकार असल्याची टीका राऊतांनी केली आहे.
'काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आज परीक्षेची वेळ आहे. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये अशी त्यांची ही भूमिका होती. आता शिवसेना पुढे निघून गेली आहे. तसेच मला आशा आहे की, ते ही सोबत येतील. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. भाजपने ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण भाजपने विरोधी पक्षात राहण्याची भूमिका घेतली. पण सेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. भाजपचं शिवसेनेविरोधात मोठं षडयंत्र आहे. राज्यातील पक्ष हे राष्ट्रद्रोही नाही आहेत. काही मुद्द्यावर मतभेद असतात. ते भाजपसोबत पण होते.' असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य आमचं आहे. देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. राष्ट्रपती राजवट लागू करुन सत्तेची सूत्र हालवावी असं कारस्थान सुरु आहे. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं एकमत आहे. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.