मुंबई: भाजपकडून गुरुवारी संध्याकाळी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये केवळ चार उमेदवारांचीच नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनुकळे, विनोद तावडे, राजपुरोहित यांच्या उमेदवारीचे काय होणार, हा प्रश्न अद्यापरी अनुत्तरित आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयीची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.
खडसेंना तिकिट न मिळण्याचे संकेत, वेट ऍण्ड वॉच , तर 'अपक्ष लढा' कार्यकर्त्यांचा नारा
दरम्यान, भाजपच्या तिसऱ्या यादीत काशीराम पावरा ( शिरपूर), मल्लिकार्जून रेड्डी (रामटेक), परिणय फुके (साकोली), रमेश ठाकूर (मालाड पश्चिम) या उमेदवारांची नावे आहेत. यापैकी परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी फडणवीस यांचे माजी स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. यामध्ये मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील मोजक्याच जागा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता या जागांवर एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राजपुरोहित यापैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.