मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली इथं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांचा आयएसआय आणि अंडरवर्ल्ड मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करुन असलेल्या दहशतवात्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. मग राज्याचं एटीएस झोपलं होतं का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनी यासंदर्भात मुंबईत एक पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
नवरात्र, रामलीला उत्सव काळात घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून आयएसआयने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट रचला होता, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलेने या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.
या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर भूमिका स्पष्ट करावी, आणखी काही लोकं राज्यात लपली आहेत का? याबाबतीतली चौकशी वाढवावी, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
ही बाप्पाची कृपा एवढ्या बाजूला धारावीत असताना कट सफल झाला नाही, राज्यातील पोलिसांचं दुर्लक्ष होतंय, नको त्या विषयावर पोलीस लक्ष देत आहेत, आमदार लुक आउट नोटीस , पत्रकाराला मारहाण अशा विषयांकडे त्यांना लक्ष द्यायला लावत आहेत, केवळ राजकारणाकडे लक्ष गंभीर विषयाकडे दुर्लक्ष अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. हे संपूर्ण राज्य सरकारचं अपयश असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.