'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'

आमचे सरकार चांगल्याप्रकारे स्थिरावले आहे, कामही करत आहे.

Updated: Feb 23, 2020, 08:16 PM IST
'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे' title=

मुंबई: भाजपने राज्य सरकावर वारेमाप आरोप करण्यापेक्षा समजुतदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  महाविकासआघाडीची बैठक पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आमचे सरकार चांगल्याप्रकारे स्थिरावले आहे, कामही करत आहे. हीच गोष्ट भाजपच्या पचनी पडत नसल्याने ते आमच्यावर वारेमाप आरोप करत आहेत. मात्र, सरकारच्या कामाचे कौतुक करणे, हेदेखील चांगल्या विरोधी पक्षाचे लक्षण आहे. विरोधकांनी तक्रारी आणि व्यथा जरूर मांडाव्यात. पण सरकार काहीच करत नाही, ही भूमिका अयोग्य आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपने समजुतदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. 

या पत्रकारपरिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील उपस्थित होते. भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आरोपांना या तिन्ही मंत्र्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. उद्यापासून महाविकासआघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. 

सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. 

गेल्या सरकारने कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर सात महिन्यांनी निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. ही अंमलबजावणी अजूनपर्यंत सुरु आहे. मात्र, आमचे सरकार निश्चित कालावधीत कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'विरोधकांचे वय ६ ते ११ असेल तर मोफत चष्मे देऊ'
आमचे सरकार आता स्थिरावले असून कामही करत आहे. हीच गोष्ट विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ते सरकारवर वारेमाप आरोप करत आहेत. शिवभोजन योजना सुरु झाल्यानंतरही भाजपने सरकारवर टीका केली. एकतर स्वत: काही करायचे नाही आणि इतरांनी काही केले तर त्यावर टीका करायची अशा भाजपची कार्यपद्धती आहे. मात्र, विरोधी पक्षाने डोळे उघडे ठेवून सरकारची चांगली कामेही पाहिली पाहिजेत. त्यांचे वय ६ ते ११ मध्ये असेल त्यांना सरकारी योजनेतून मोफत चष्मे देऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

एल्गार परिषदेचा तपास मी केंद्राकडे दिला नाही- उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपासयंत्रणेकडे (NIA) दिला नसल्याचे स्पष्ट केले. हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. मात्र, ज्या पद्धतीने केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला त्यावर आम्ही नाराज आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

'इतरांवर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते पाहा'
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचे सरकार आहे. मात्र, याठिकाणी CAA किंवा NRC वरून दंगली झाल्या नाहीत. भाजपचे सरकार असलेल्या ठिकाणीच दंगली झाल्या आहेत. भाजपच्या ताब्यात सुरक्षायंत्रणा असलेल्या दिल्लीच्या शाहीन बागेत ६० दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरु आहे. तसेच दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातही अतिरेकी (अभविप कार्यकर्ते) घुसले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप त्या गुन्हेगारांना पकडल्याचे दिसत नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

'सावरकरांबाबत योग्य वेळ आल्यावर बोलेन'
स्वातंत्र्यवीर सावकरांबाबत योग्य वेळ आल्यावर मी बोलेन. मात्र, भाजपचे राम कापसे अंदमानचे राज्यपाल असताना अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाची पाटी काढून ठेवण्यात आली होती. मात्र, तेव्हा भाजपने त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. भाजपने एकट्यानेच हिंदुत्व आणि सावरकरांचा मक्ता घेतलेला नाही. भाजप म्हणेल तेच हिंदुत्व ही गोष्ट आपल्याला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.