काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती 

Updated: Jun 27, 2020, 09:24 AM IST
काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल title=

मुंबई: भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेते चीनवर केवळ शाब्दिक हल्ले करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सीमेवरील लाल माकडे पळून जातील, असे त्यांना वाटते. एवढेच नव्हे तर चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी सातत्याने चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. हा हल्ला परतवून लावण्यासाठी चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मोठी आर्थिक देणगी मिळाल्याचा मुद्दा भाजपने उकरून काढला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि दिल्लीतील प्रमुख नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 

'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'

राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी वकिलातीकडून देणगी मिळाली, हा फुगा भाजपने फोडला. मात्र, ही माहिती प्रसिद्ध झाल्याने सीमेवरील चीनच्या हालचालींवर निर्बंध येणार आहेत का? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे २० जवान शहीद झाले  त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे. आपल्या देशातील अनेक राजकीय पुढारी आणि पक्ष परराराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. 

चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक

तसेच सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नवे बांधकाम सुरु झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडका मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाशी भाजपला केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.