भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Aug 10, 2020, 10:03 PM IST
भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण title=

मुंबई: भाजपचे धडाडीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मी व माझी पत्नी यांना करोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या काळात किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनेक भागांनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी सातत्याने सरकारी रुग्णालयांतील दुरावस्था आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात किरीट सोमय्या सातत्याने चर्चेत होते. मात्र, सतत बाहेर फिरत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली होती. त्यांच्या घरातील ६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, तिघांचे चाचणी अहवाल अद्याप यायचे आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. काळजी घेतो आहे. आपणही घ्या, असे त्यांनी सांगितले होते.

राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत १,२४,३०७ कोरोनाबाधित असून त्यापैकी ९७,९९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मुंबईत ६८४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १९,१७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.