Kiriet Somayya On Ravindra Waikar: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर पुराव्यासह भ्रष्टाचाऱ्याचे आरोप केले. यातील काही नेते पुढे भाजपमध्ये, मित्रपक्षात आले. यानंतर सोमय्या यांची गोची झाल्याचे चित्र दिसून आले. आमदार रविंद्र वायकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकरयांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि रविंद्र वायकर यांची पत्नी यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान रविंद्र वायकरांनी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात प्रवेश केला. यावर सोमय्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर काय म्हणाले सोमय्या? सविस्तर जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे यांचा फायनान्स पार्टनर रविंद्र वायकर याने त्यांची साथ सोडली आहे.उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली ते पाहून वाईट वाटतंय, अशी खोचक टीका त्यांनी केली. गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराचे टेरेरिझम सुरू होत ते आम्ही संपवलं आहे. कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही.किरीट सोमय्या यांचे काम असेच सुरू राहणार, असे ते म्हणाले.
ज्यांच्यावर मी आरोप केले अशा विविध पक्षांतील 2 डझन नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्या त्या तपास यंत्रणानी तपास कसा पुढे न्यायचा हा त्यांचा भाग आहे, असे सोमय्यांनी सांगितले.
वायकर असो किंवा आणखी कुणी असो. मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिले त्यामुळे ही उद्धव ठाकरेंची दहशत संपवली आहे. माझी लढाई अशीच सुरू राहणार असल्याचे सोमय्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
मोदींच्या गॅरंटीचे राज्यात पालन होणार आहे. यापुढे कुणीही भ्रष्टाचार केला तरी त्याला माफ केले जाणार नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. आता न्यायालयाने काय करायचे? हा त्यांचा प्रश्न आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे..माझ्याकडे कोणतेही पद नाही, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्यासाठी शरद पवार एवढं बोलत आहेत. कर्ज कोणी मिळवले आणि ते कर्ज कुठे फिरवले हे देखील पवार साहेब सांगा ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच याचमुळे रोहित पवार यांच्या कारखान्यावर जप्ती आलेली असल्याचे सोमय्या म्हणाले.