'सोनू सूद, राऊतांच्या टीकेकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचंय रोग्याशी नाही'

चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर कडवट टीका

Updated: Jun 9, 2020, 03:47 PM IST
'सोनू सूद, राऊतांच्या टीकेकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचंय रोग्याशी नाही' title=

मुंबई: अभिनेता सोनू सूद याच्या मदतकार्याविषयी शंका उपस्थित करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'डिअर सोनू सूद, तू खूप चांगलं काम करत आहेस. राऊतांकडं लक्ष देऊ नकोस. आपल्याला रोगाशी लढायचं आहे. रोग्याशी नाही...' चित्रा वाघ यांच्या या ट्विटमुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. इतक्या कडवट टीकेला आता संजय राऊत कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चांगली कामं करणारी लोकं भाजपमध्येच असतात; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक मजुरांना गावी जाण्यासाठी बसची सोय करुन दिली होती. सोशल मीडियावर सोनू सूदच्या या कामाचे खूप कौतुक झाले होते. मात्र, संजय राऊत यांनी सोनू सूदच्या या कृतीमागे राजकीय डाव असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अकार्यक्षम आहे, हे दाखवण्यासाठी काही भाजप नेत्यांच्या मदतीने सोनू सूदच्या कामाला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटींनी मदत केली. पण त्यांचे हे दान गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते, अशी टीकाही राऊत यांनी केली होती.

सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं

या सगळ्या वादानंतर सोनू सूदने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यानंतर हे प्रकरण निवळेल असे वाटत होते. परंतु, यावरुन आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.