मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर चांगलच राजकीय वातावरण तापलं आहे. राणेंविरोधात गुन्हा दाखल झालं असून त्यांच्या अटकेकरता पथक रवाना झालं आहे. मंगळवारी अगदी सकाळपासून सुरू झालेल्या शिवसेना - नारायण राणे राडा या मुद्यावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करणं न करणं हा मुद्दा नाही. गेले दोन दिवस नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू आहे. दोन दिवसांपासून राणेंच्या एका वक्तव्यावर शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. सत्तेचा दुरूपयोग म्हणजे एका केंद्रीय मंत्र्याला अटक, पथक निघाले. हा सत्तेचा दुरूपयोग आहे. हे राजकीय सुड बुद्धीतून सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरे यांचं दसऱ्याचं भाषण काढा. शाब्दिक प्रतिवाद न करता थेट अटक. इशारा नाही, समज नाही. मोदींविरोधातही अशा प्रतिक्रिया येतात. मग तेव्हा एक नाही अनेक कलम लावता येतील, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी दादर इथल्या शिवसेना भवन परिसरात शांतता पाहायला मिळत आहे. रात्री दादर परिसरात नारायण राणे यांना उद्देशून कोंबडी चोर असे पोस्टर्स लावण्यात आले होते ते तत्काळ काढण्यात आले आहेत. दरम्यान सध्यातरी शिवसेना भवन परिसरात शांतता आहे. मात्र महाराष्ट्रात याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत.