मुंबई : मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान नावाचा अवैधरित्या फलक लावल्याचा आरोप करीत भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले आहे. कालच महापौर किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणी भूमिका स्पष्ट केली होती. याप्रकरणी आज भाजपनेते अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून टीका केली आहे.
अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, 'मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थितीमध्ये होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी?
यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या मा.महापौर किशोरीताई पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरतायेत.'
'वास्तविकतेत जर टिपू सुलताना नामफलक अवैध असले तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालक मंत्र्यांच्या बचाव कार्यातच त्या मग्न आहेत.
धक्कादयाक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प साठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालक मंत्री अवैध रित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत.' असेही साटम यांनी म्हटले.
यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे, अशी विनंती देखील साटम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.