भाजपची सर्व घडामोडींवर नजर, योग्यवेळी निर्णय घेणार- मुनगंटीवार

आज दुपारपासून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु होती.

Updated: Nov 11, 2019, 09:46 PM IST
भाजपची सर्व घडामोडींवर नजर, योग्यवेळी निर्णय घेणार- मुनगंटीवार title=

मुंबई: सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाजप बारीक लक्ष ठेवून आहे. आता भाजप योग्यवेळ पाहून निर्णय घेईल, असे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांकडून निवडणुकीत तिसरा मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सुरु असलेल्या वाटाघाटी सुरु होत्या. या पार्श्वभूमीवर दुपारपासून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी भाजप सध्या वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले. आम्ही सध्याच्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आता योग्यवेळी निर्णय घेऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार

त्यामुळे आता आगामी काळात काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर शिवसेना त्यांना साथ देणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. तसेच भाजप पुन्हा शिवसेनेशी बोलणी सुरु करण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविली जात आहे.