भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, नाना पटोलेंवर कारवाई होणार?

भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी काय दिलं आश्वासन?

Updated: Jan 18, 2022, 06:54 PM IST
भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, नाना पटोलेंवर कारवाई होणार?  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने (BJP Delegation) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली.

या राज्यात सरकारच्या आशिर्वादाने संविधानाचा, घटनेचा, विचारांचा गळा घोटण्याचं जे काम सुरु आहे, ते राष्ट्रपतींना कळवावं, आणि महाराष्ट्रात सुरु असलेली अराजकता थांबावावी अशी विनंतीही राज्यपालांना केल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी पटोलंवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 

मात्र कारवाई न झाल्यास उद्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषण करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. 

नाना पटोले यांचं 'ते' वक्तव्य
मी गेली ३० वर्ष राजकारणात आहे. लोक ५ वर्ष राजकारण करतात आणि नंतर विसरून जातात. पण, मी राजकारणात असताना जो माझ्याकडे आला त्याला मदत केली. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो हे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.

नाना पटोले यांच्या या वक्त्यव्यावरून वादंग माजला. भाजपकडून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया आल्यानतंर पटोले यांनी मी गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, पंतप्रधान मोदींबाबत नाही अशी सारवासारव केली.