मुंबई : मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नाही, त्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतीमान करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तर भाजपचे दुसरे नेते किरीट सोमय्या यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नाही! अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता! @mybmc | @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @ShelarAshish #MaharashtraFightsCorona
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 8, 2020
ठाकरे सरकारमुळे मुंबई कोरोनाची राजधानी झाली आहे आणि बळीचा बकरा म्हणून मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशींची बदली केली आहे. जबाबदारी राजकीय नेतृत्वाने घेतली पाहिजे, असं टीकास्त्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोडलं आहे. त्यांनी पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एका पालकमंत्र्याचा वरळी मतदारसंघ हा तर हिंदुस्थानातला सर्वात घाणेरडा कोरोनाग्रस्त विभाग आहे. राजकीय नेतृत्वाने जबाबदारी घेतलीच पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले. आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे आणि ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे सोमय्या यांना जबाबदार धरून त्यांच्यावर थेट टीका केली आहे.