मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या पार्श्वभुमीवर ३ मे पर्यंतचे लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आले. राज्य रेड, ऑरेंज, ग्रीन अशा झोनमध्ये विभागण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असताना काही संकेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिले. मुंबईत लष्कर येईल अशी अफवा आहे. पण पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात सांगितले.
कालच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांची एकजूट दिसली. औरंगाबाद येथील घटनेने व्यथीत झालोय असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मजुरांची सोय केली आहे. इतर राज्यांसोबत बोलणी सुरु आहे. मजुरांना ट्रेनने नेण्याची सुरुवात मुंबई, पुण्यातून झाली आहे. गर्दी उसळली तर धोका वाढेल आणि सर्व पुन्हा ठप्प होईल. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही संयम कायम ठेवा. तुमचे सहकार्य गरजेचे आहे असे त्यांनी मजुरांना सांगितले.
मुंबईत लष्कराची गरज नाही. हे युद्ध आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे लष्कर मुंबईत येणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलीस तणावाखाली आहेत, थकले असून त्यांना विश्रांतीची गरज आहे. यांच्या मदतीसाठी राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉक्टर्स, पोलीस यांच्याबाबतीत गलथनपणा मी खपवून घेणार नाही. पोलीस, डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेणार नाही. अशांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. डॉक्टरांनीही गलथनपणा टाळावा असे ते म्हणाले.
लॉकडाऊन वाढावावा असं वाटतं नाही. बंधन पाळणं, शिस्त पाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.