जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपची राज्यपालांकडे तक्रार

पीडित तरुणाच्या भेटीसाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनी रोखले?

Updated: Apr 8, 2020, 02:27 PM IST
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपची राज्यपालांकडे तक्रार title=

मुंबई :  सोशल मीडियावरून गलिच्छ टीका केल्यानं त्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी याबाबत थेट राज्यपालांना फोन करून या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रविवारी देशवासियांना घरात दिवे लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाची खिल्ली उडवत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी भूमिका घेतली होती.

त्यानंतर ठाण्यातील अनंत करमुसे या तरुणाने आव्हाडांबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. पोलिसांनी करमुसे याला पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आले व तेथे आव्हाडांसमोर करमुसे याला बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे.  

दरम्यान, भाजप नेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फोन करुन या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. संबंधित मंत्र्यांना समज देण्याची विनंती केली. राज्यपालांनी ही विनंती मान्य केल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

 

किरीट सोमय्यांना रोखले?

या प्रकरणात मारहाण झालेला तरुण अनंत करमुसे याच्या भेटीसाठी निघालेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रोखलंअशी माहिती सोमय्या यांनी दिली. आज सकाळी ११ वाजता ते करमुसे याची भेट घेणार होते. पण तत्पुर्वीच सोमय्यांना त्यांच्या घरी स्थानबद्ध केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.