कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये; उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत. 

Updated: Apr 8, 2020, 03:21 PM IST
कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये; उद्धव ठाकरेंची घोषणा title=

मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.

याठिकाणी डॉक्टरांना गरज वाटल्यास ते संबंधित व्यक्तीला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतील. मात्र, यानंतर कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत. त्यासाठी रुग्णालयांचीही तीन भागात विभागणी करण्यात येईल. यापैकी पहिल्या प्रकारच्या रुग्णालयात कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यासाठीच्या रुग्णालयांत कोरोनाची मध्यम लक्षणे जाणवणाऱ्या लोकांना ठेवण्यात येईल. 

तर तिसऱ्या प्रकारातील रुग्णालयात कोरोनाची तीव्र किंवा गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाचा भरती करून घेण्यात येईल. रक्तदाब, मधुमेह किंवा किडनीच्या विकाराचे रुग्ण असलेल्या कोरोनाग्रस्तांवर याठिकाणी उपचार होतील. ही रुग्णालये इतर दोन प्रकारातील रुग्णालयांच्या तुलनेत सुसज्ज असतील. तसेच याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाग्रस्तांकडून रुग्णालयातील इतरांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याची कबुली दिली. त्यामुळे आगामी काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारतीय लष्कराच्या आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक आणि नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला मदत करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी संबंधितांनी Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर आपले नाव, माहिती आणि मोबाईल नंबर पाठवावा. मात्र, इतर नागरिकांनी या ईमेल आयडीवर विनाकारण सूचना पाठवू नयेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मास्क छत्रीसारखा वापरू नका
आतापासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडायचे असल्यास नागरिकांनी मास्कचा वापरावाच. घरात आल्यानंतर हा मास्क धुऊन ठेवावा. मात्र, एकाच कुटुंबातील लोकांनी या मास्कचा वापर छत्रीसारखा करू नये. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र मास्क वापरावा. याशिवाय, वन टाईम यूज मास्क वापरत असल्यास त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

हृदयविकार असलेल्या लोकांनी खाण्यावर बंधने ठेवा
लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरात राहून कंटाळा आला असेल तरी ते गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी निराश न होता आपण तंदरुस्त आणि आनंदी कसे राहू, याकडे लक्ष द्यावे. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हृदयविकाराशी संबंधित व्याधी असलेल्यांनी खाण्यावर बंधने ठेवावीत. घरी नियमितपणे व्यायाम करावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.