मुंबई मनपाचा मोठा निर्णय, दक्षिण मुंबईतल्या 4 झोपडपट्टी परिसरातील सांडण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार

दक्षिण मुंबईतील  4 झोपडपट्टी परिसरातील 4 लाख 85 हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे, यासाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत 4 प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे

राजीव कासले | Updated: Jun 29, 2023, 06:39 PM IST
मुंबई मनपाचा मोठा निर्णय, दक्षिण मुंबईतल्या 4 झोपडपट्टी परिसरातील सांडण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार title=

मुंबई : सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसरालगत आणि समुद्रालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा (Waste Water) विसर्ग समुद्रात होत होता. मात्र, पर्यावरण पूरकतेच्या दृष्टीने या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर (Water Recycled) करण्याचा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) हाती घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त - प्रशासक इकबाल सिंह चहल  (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे (Ashwini Bhide) आणि सह आयुक्त (दक्षता)  अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या या पथदर्शी प्रकल्पांतर्गत 4 ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. याद्वारे दररोज तब्बल 4 लाख 85 हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातील 4 प्रक्रिया केंद्रांद्वारे प्रक्रिया केलेले पाणी हे परिसरातील शौचालयांमध्ये आणि उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे सांडपाण्याचा योग्य वापर होण्यासोबतच पर्यावरणपूरकता देखील जपली जाणार आहे.

सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत विविध 4 ठिकाणी झोपडपट्टी परिसर आहे. यामध्ये टाटा उद्यानाजवळ असणारा शिवाजी नगर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण बाजूला असणारा दर्या सागर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूला असणारा दर्या नगर परिसर आणि ऍनी बेझंट मार्गावरील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनच्या समोर असणाऱ्या मार्केडेश्वरच्या मागील परिसर. या 4 परिसरांचा समावेश आहे. या चारही परिसरांमध्ये सुमारे 9 हजार 500 इतकी लोकवस्ती आहे. या चारही परिसरांसाठी इथल्या लोकसंख्येच्या गरजेनुसार सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित 3 प्रक्रिया केंद्रांचे काम देखील वेगात सुरु आहे. 

यापैकी शिवाजी नगर इथल्या प्रक्रिया केंद्राची क्षमता ही दररेज 50 हजार लीटर (KLD) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असून दर्या सागर प्रक्रिया केंद्राची क्षमता ही 35 हजार लीटर इतकी आहे. तर दर्या नगर आणि मार्कंडेश्वर मंदिराच्या मागील परिसर इथल्या प्रक्रिया केंद्रांची क्षमता ही अनुक्रमे दररोज 1 लाख लीटर आणि 3 लाख लीटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. यानुसार चारही प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज 4 लाख 85 हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. 

चारही परिसरातील सांडपाण्यावर जागीच प्रक्रिया व्हावी आणि ते पुन्हा वापरता यावे. यासाठी स्माईल कौन्सिलच्या माध्यमातून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी इंद्र कांत झा यांच्या 'एमर्जी एन्वायरो' या स्टार्टअपने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित 'इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्राथमिक स्तरावर सागरी किनारा लगतच्या परिसरांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. 

अशी होणार सांडपाण्यावर प्रक्रिया
'इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी'चा पथदर्शी प्रकल्पामध्ये संबंधीत परिसरातील मलजल किंवा सांडपाणी हे उदंचन पंपांच्या साहाय्याने ओढले जाते आणि ते प्रथमतः भूमिगत टाकीमध्ये साठवलं जातं. या टाकीमध्ये चार कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. द्वितीय स्तरिय प्रक्रियेमध्ये कर्दळी सारख्या नैसर्गिक झाडांच्या मदतीने पाणी स्वच्छ करण्यात येते. विशेष म्हणजे या प्रक्रिया केंद्रांमध्ये सुरुवातीला सांडपाणी ओढणे आणि नंतर स्वच्छ पाणी सोडणे, या व्यतिरिक्त कुठेही पंप किंवा अन्य तंत्रज्ञानांचा वापर केला जात नाही. 

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्यान किंवा शौचालयांसाठी पुनर्वापर !
इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी'च्या सहाय्याने प्रक्रिया करून स्वच्छ केलेल्या पाण्याचा उद्यान किंवा शौचालयांसाठी पुनर्वापर करणे शक्य असणार आहे. तसंच प्रक्रिया केंद्र हे प्रक्रिया केंद्र भूमिगत असल्याने ते ज्या ठिकाणी असणार आहे, त्याच्या वर झाडेही लावणे शक्य होणार आहे. प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर पाण्याचा कोणताही वास किंवा घाण परिसरात पसरत नसल्यामुळे संबंधीत जागा कायम वापरात राहू शकते. प्रक्रिया केंद्रे व त्यातील संयंत्रे ही स्वयंचलित व संगणकीय यंत्रणेवर आधारीत असल्यामुळे केवळ एक व्यक्ति ही चारही संयंत्रांवर देखरेख ठेवण्यास पुरेशी आहे.