Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 29, 2023, 06:23 PM IST
Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस title=

Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीसंबंधी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवार यांनी उत्तर देताना फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं असून माझ्यामुळे त्यांच्या तोंडी अर्ध सत्य आलं असून, उर्वरितही लवकर बोलायला लावू असा इशारा दिला आहे. 

"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले

 

"मला अतिशय आनंद आहे की, शेवटी शरद पवारांना सत्य सांगावं लागलं. मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आलं आहे. पण ते सत्य अर्धच आहे. अजून उरलेलं सत्यही मी बाहेर काढीन. पण त्यांच्या गुगलीमुळे माझ्या जागी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले. त्यांनी स्वत:च्या पुतण्याचीच विकेट काढली आहे. पण हरकत नाही, उरलेलं सत्यही लवकरच बाहेर येईल," असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

"आमची बैठक झाली आणि दोन दिवसांनी भूमिका बदलली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी तर जाहीर बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवण्यास लोक कमी पडत असतील तर बाहेरुन राष्ट्रवादी पाठिंबा देईल. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी हे सांगितलं होतं. नंतर द्यायची वेळ आली नाही. त्यांचं फार कौतुक होतं असं काही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या मित्रांमध्ये अंतर कसं पडेल याची काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता," असं शरद पवारांनी सांगितलं. 

"मुंबई, पुण्यासह राज्यातून हजारो महिला बेपत्ता, जबाबदारी घ्या", शरद पवारांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

 

पुढे ते म्हणाले की, "ते भेटले ही गोष्ट खरी आहे. चर्चा झाली हेदेखील खरं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की, मी दोन दिवसांत धोरण बदललं. जर मी धोरण बदललं तर त्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं. ती शपथदेखील अशी चोरुन का पहाटे घेतली. जर आमचा पाठिंबा होता तर दोन दिवसांत सरकार कोसळलं कसं? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यावा लागला याचा अर्थ सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो त्यांची ही भूमिका समोर आणण्यासाठी यादृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या". 

"उद्या मी तुम्हाला राज्यपाल करतो, शपथ घ्यायला या सांगा तर येणार का? मोदींचा यामध्ये काही संबंध नव्हता. कारण सत्तेत नसल्याने करमत नसणारे मोदी नव्हते. ते राज्यातील होते," असा टोला शरद पवारांनी लगावला. "आम्ही सत्तेतसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याच्याशिवाय जगू शकत नाही हे महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं होतं," असंही त्यांनी सांगितलं.

"आमच्या बैठकीत सर्व चर्चा झाल्या होत्या. पण तीन दिवसांपूर्वी जर आम्ही माघार घेतली तर शपथ का घेतली? आता मी टाकलेला डाव होता की नाही हे माहिती नाही. तुम्ही काय ते ठरवा," असं ते म्हणाले.

"माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सदाशिव शिंदे. ते देशातील उत्तम गुगली गोलंदात होते. मोठमोठ्या लोकांचे त्यांनी विकेट घेतले होते. आणी मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळत नसलो तरी गुगली कसा आणि कुठे टाकायचा हे माहिती होतं. आता विकेट दिली, तर करायचं काय. विकेट घेतलीच पाहिजे," असा टोलाही शरद पवारांनी लगावला. फडणवीस काहीही म्हणत असले तरी आपली विकेट गेली हे सांगत आहेत का? अशीही विचारणा त्यांनी केली. 

शरद पवारांनी आमचा डबलगेम केला - देवेंद्र फडणवीस 

"शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली. एकाप्रकारे त्यांनी आमचा डबलगेम केला," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी आधी केला होता.