प्रशांत अंकूशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईत गजबजलेल्या ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरताना सौ का तीन...सौ का तीन अशी आरोळी ठोकत नामांकित कंपन्यांचे शाम्पू विकणारे विक्रेते सर्रासपणे दिसतात. याच स्वस्ताईला भुलून अनेकजण या शाम्पूची खरेदीही करतात.
पण स्वस्त आणि मस्त वाटणाऱ्या शाम्पूमुळे तुमच्या केसांना हानी पोहचू शकते. सिल्की, डँड्रफ फ्री केसांऐवजी तुम्हाला टक्कल पडू शकतं. प्रसंगी विग लावण्याची वेळ येऊ शकते. कारण मुंबईतल्या धारावीत बोगस शाम्पू कारखान्याचा पर्दाफाश झालाय.
या कंपनीत ईजी मॅक्स पावडरच्या साह्यानं शाम्पू बनवले जात होते. आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 3 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय.
असा बनवला जातो बोगस शाम्पू
बोगस शाम्पू बनवण्यासाठी पाण्याचे दोन मग भरून ईजी मिक्स पावडर 50 लिटर पाण्यात मिसळली जायची. त्यानंतर त्यात सुगंधी द्रव्य टाकलं जात होतं. बोगस शाम्पू बाजारात विकण्यासाठी भंगारवाल्याकडून नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या विकत घेतल्या जायच्या.
त्यात नकली शाम्पू भरून बाटलीला लॅमिनेशन केलं जायचं. पुढे या मालाची विक्री अत्यंत स्वस्त दरात गर्दीच्या ठिकाणी किंवा आठवडी बाजारात केली जायची.
मुंबईत अनेक जण हा स्वस्तातला माल विकत घेतात. पण या बोगस शाम्पूमुळे तुम्हाला डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा...सौ का तीनच्या चक्करमध्ये आपल्या डोक्यावरचे केस तर जाणार नाहीत ना, याची काळजी घ्या.