थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... नशेच्या सौदागरांची 'बलून गँग' पोलिसांच्या रडारवर!

एकीकडं 2018 च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडं नशेच्या सौदागरांनीही आपले हातपाय पसरायला सुरूवात केलीय. यावेळी माहौल आणखी नशिला बनवण्यासाठी त्यांनी एक नवा अंमली पदार्थ आणल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Updated: Dec 22, 2017, 10:55 PM IST
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... नशेच्या सौदागरांची 'बलून गँग' पोलिसांच्या रडारवर! title=

राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : एकीकडं 2018 च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडं नशेच्या सौदागरांनीही आपले हातपाय पसरायला सुरूवात केलीय. यावेळी माहौल आणखी नशिला बनवण्यासाठी त्यांनी एक नवा अंमली पदार्थ आणल्याची सूत्रांची माहिती आहे. 

लंडन आणि संपूर्ण युनायटेड किंगडममध्ये धुमाकूळ घालणारा लाफिंग गॅस आता मुंबईतल्या पार्ट्यांमध्येही पसरणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करणाऱ्या पार्ट्यांमध्ये लाफिंग गॅस नावाचा हा अंमली पदार्थ विकला जाणार आहे. या पदार्थाचा अंमल थोड्या तासांसाठी राहतो... ही नशा करणारी व्यक्ती अचानक हसू लागते. त्यामुळंच तरूणाईमध्ये या ड्रग्जची खास क्रेझ आहे. काही तासांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये या अंमली पदार्थाला जास्त मागणी असते.

काय आहे हा लाफिंग गॅस....

या लाफिंग गॅसचं रासायनिक नाव आहे... नायट्रस ऑक्साइड... रंगहीन अशा या पदार्थाची चव थोडी गोड असते. हा कमी टॉक्सिक असलेला अंमली पदार्थ आहे. पण इतर ड्रग्जसोबत मिसळून घेतला तर तो हानीकारक ठरू शकतो. यामुळे फुफ्फुसाला त्रास, जीवनसत्वांची कमी आणि मानसिक संतुलन बिघडणं असे विकार होऊ शकतात.

पोलिसांची करडी नजर

अंमली पदार्थांचा सर्वाधिक खप होतो तो न्यू इयर पार्ट्यांमध्ये... त्यामुळंच विविध मार्गांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थांचा साठा पोहोचवला जातो. त्यासाठी रस्त्यावर फुगे विकणा-यांपासून ते पार्ट्यांमध्ये फुग्यांचं डेकोरेशन करणा-यांपर्यंत सगळ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे. तर दुसरीकडं पोलिसांना चकवा देऊन पार्टीमध्ये ड्रग्ज पोहोचवण्यासाठी खास कोडवर्ड तयार करण्यात आलेत. 

सावधान... 

दातावरील उपचारांच्या वेळी थोडा काळ गुंगी देण्यासाठी या पदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळं बाजारात हा पदार्थ सहज उपलब्ध होतो. मात्र, आता काही ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून तो मागवला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. त्यामुळं नववर्षाच्या पार्टीत एखादा तरूण-तरूणी फुंग्याबरोबर खेळत असेल तर सावध राहा... कारण या खेळ जीवासाठी प्राणघातक ठरू शकतो.