बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता - आदित्य ठाकरे

युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शनास भेट दिली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या.  

Updated: May 19, 2022, 02:22 PM IST
बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता - आदित्य ठाकरे title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( SHIVSENAPRAMUKH BALASAHEB THACKAREY ) यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील ( MUMBAI UNIVERSITY ) दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( aditya thackeray ) यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी जपलेल्या जुन्या नात्यांच्या आठवणी सांगितल्या. 

बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही तेव्हापासून होती. वर्षानुवर्षे होती. मला असं वाटतं की आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते.

कारण, त्यांच्याबरोबर मी राहिलो. मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या बरोबर दौऱ्याला जात असे. म्हणजे एक क्षण असा होता की एक निवडणूक जिंकलो होता. चौथ्या दिवशी माझी परीक्षा होती. मी आईला न सांगताच वडिलांबरोबर दौऱ्याला निघून गेलो. आईचा फोन आला, अरे तू कुठे गेला परवा तुझी परीक्षा आहे.

राजकारणात ही सगळी मंडळी अग्रेसर होती, पुढे होती. मग महाजन असतील, मुंडे साहेब असतील. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टोकाची टीका,आरोप- प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही.

आज मोठे साहेब ( बाळासाहेब) असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता. कारण त्यांच्या मित्राबरोबर (शरद पवार) ( SHARAD PAWAR ) युती आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राला एकत्र नेण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

  

प्रमोदजी, पवार साहेब, मोठे साहेब यांचं त्यावेळेचं राजकारण वेगळं होत. राजकीय व्यासपीठावर जी काही टीका टिपण्णी व्हायची ती टोकाची व्हायची पण पातळी कधी खाली नेली नाही कधी मैत्री विसरली नाही, कधी एकमेकांवर खोटे आरोप, खोटे गुन्हे कधीच दाखल झाले नाहीत, आज हे मिसिंग आहे असे आदित्य यांनी आवर्जून नमूद केले. 

मुंबई विद्यापीठात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास छायाचित्राद्वारे उलगडण्यात आलाय. शिवसेनेचे पुणे येथील अधिवेशन, रमेश प्रभू निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोष, १९९५ ला निवडणूकीला मतदान करतानाचे छायाचित्र, शिवाजी पार्क येथील सभेतील विविध भावमुद्रा, गिरगाव सभेतील प्रसिद्ध छायाचित्र अशी अनेक छायाचित्र येथे लावण्यात आली आहेत.