Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केले होते. घटना समोर आल्यानंतर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत संतप्त बदलापूरकरांनी तब्बल 9 तासांचा रेल रोको केला होता. मात्र याच आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.. त्यानंतर या एन्काऊंटरवर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
बदलापुरात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला.आणि आता याच एन्काऊंटरवरुन आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. आरोपी अक्षय शिंदेला बदलापूरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली?अक्षय शिंदेला पिस्तुलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढतो? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय.तर बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक आता आरोपीची बाजू घेताहेत.हे माणुसकीला काळीमा फासणारं आहे... विरोधकांच्या प्रतिक्रियांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय..ती गोळी पोलिसाच्या मांडीला कशी लागली असा सवाल विचारत प्रकाश आंबेडकरांनी मेडिकल रिपोर्टची मागणी केलीय.
आधी विरोधक सांगत होते अक्षय शिंदेला फाशी द्या.. आणि आता त्याला का मारलं असं विचारतायत.. हे कसं चालेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सुनावलंय. माझ्या मुलाला दुपारीच भेटले आणि आता गोळ्या घालून मारून टाकलं.. आता आम्हालाही मारा असा आक्रोश अक्षय शिंदेचा आईने केलाय.
अक्षय शिंदेनं त्याच्या जबाबात काही भंयकर खुलासे केलेत. हे खुलासे समोर येऊ नये, यासाठी त्याला मारलं. संपूर्ण प्रकरण मुळासकट संपवलं, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.तर बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत... त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
अक्षयला मुद्दाम मारल्याच्या आरोपात तथ्य वाटत नाही असं बदलापूर प्रकरणातले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर आणि पोलिसांवर आरोप होत असताना आता सत्ताधारीही विरोधकांवर तुटून पडले आहेत.. अक्षय शिंदेला हुतात्मा करण्याच्या भानगडीत पडू नका असा इशाराच भाजप नेते आशिष शेलारांनी मविआच्या नेत्यांना दिलाय.दुसरीकडे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील जखमी पोलिसांचा एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी सत्कार केलाय.
तर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील दोन पोलिसांना शर्मिला ठाकरेंनी प्रत्येकी 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.. एकीकडे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणा-या पोलिसांचा सत्कार होतोय. तर दुसरीकडे ‘देवाचा न्याय‘ ट्विटरवर ट्रेंड होतोय.
देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट करण्यात येत आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केलीय.. आता या चौकशीतून सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.