रिक्षा चालकाच्या मुलाची गरूडझेप! ISRO ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड

संयम बाळगत गाठलं एवढं मोठं यश 

Updated: May 4, 2021, 08:38 AM IST
रिक्षा चालकाच्या मुलाची गरूडझेप! ISRO ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड title=

मुंबई : बदलापुरमधील एका रिक्षा चालकाच्या मुलाची इस्त्रोत ज्युनिअर सायंटिस्ट पदासाठी निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असं या तरूणाचं नाव आहे. या मुलाच्या ISRO मधील निवडीमुळे तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Autorickshaw drivers son Devanand Patil gets selected as a Junior scientist to work for ISRO ) 

देवानंद मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे. देवानंदची यापूर्वी रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली. मात्र ही नोकरी त्याने नम्रपणे नाकारली. एवढी चांगली नोकरी नाकारल्यामुळे कुटुंबियांना प्रश्न पडला. मात्र थोडे थांबा काहीतरी वेगळे करायचे आहे, असे त्याने कुटुंबियांना पटवून दिलं. 

टाटा स्टिलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परीक्षेत देवानंद देशात ओबीसीमध्ये पहिला आला असून त्याची ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे स्पष्ट होणार असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले. देवानंदची एक बहीण इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे. 

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षाचालक असून दिवस-रात्र १२-१४ तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पत्नीने दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली. मुलांच्या या यशाने कष्टाचे चीज झाले असून हा आंनद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या.