औरंगाबादमध्ये उद्योजकांवर हल्ला, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे  

Updated: Aug 18, 2021, 06:16 PM IST
औरंगाबादमध्ये उद्योजकांवर हल्ला, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

मुंबई : उद्योगनगरी औरंगाबादमध्ये उद्योजकांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे महाराष्ट्राबाहेर विपरित चित्र जात असून, रोजगारावरही गदा येत आहे. यावर तातडीनं पावलं उचलावीत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे 

तसंच उद्योजकांवर हल्ले करणाऱ्यांवर जलदगती न्यायालयात खटले भरून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.

फडणवीसांनी पत्रात काय म्हंटलं आहे

उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर हल्ले होत असण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. 8 ऑगस्टला भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंत भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरून आलेल्या 15-20 कथित गुंडांनी मारहाण केली. यासंदर्भात संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत.

10 ऑगस्टला वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. 

स्वत: लक्ष घालून कारवाई करा

जिल्ह्यात या घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून, हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वत: यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.