युतीचे घोडे नेमके कुठे अडलेय, उत्तरासाठी २९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार?

 दहा जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचे जागा वाटपाचे घोडे पुन्हा अडले आहे. 

Updated: Sep 24, 2019, 05:01 PM IST
युतीचे घोडे नेमके कुठे अडलेय, उत्तरासाठी २९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार? title=

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात दहा जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचे जागा वाटपाचे घोडे पुन्हा अडले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होणार होती. मात्र ती होणार नसल्याने युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. शिवसेना ११५ -१२५  आणि भाजप १७३ - १६३ अशा आकडेवारी दरम्यान एकमत होण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून काल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका कायम ठेवल्याने जागा वाटपाला अंतिम स्वरूप देता आले नाही. शिवसेना - भाजप युतीचं नेमके काय चालले आहे, युतीचे घोडे नेमके कुठे अडले आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला असली तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि ती घटस्थापनेपर्यंत अंतिम टप्प्यातच राहणार आहे. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात अडसर आहे तो पितृपक्षाचा. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. पण २९ तारखेपर्यंत कुठलीही घोषणा होणार नाही. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत येऊनही मातोश्रीवर फिरकलेच नाहीत. ते पुन्हा दोन दिवसांनी मुंबईत येत आहेत. त्यामुळे काही बोलणी होणार की नाही, याचीही उत्सुकता आहे.

याआधी शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत होते. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास तयार असल्याचं देखील सुत्रांनी म्हटले होते. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही हेच झाले. युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ पितृपक्ष संपेपर्यंत संपलं नाही आणि घटस्थापनेला युतीचा घडा फुटला. आता पक्षांमध्ये काही जागा वगळता कुठलाही तिढा नाही, युतीसाठी शिवसेनेनं भाजपाशी केव्हाच जुळवून घेतले आहे. अजून उमेदवार जाहीर नाहीत, कुंपणावरचे अजूनही अस्वस्थ आहेत. मात्र, पितृपक्ष संपल्याशिवाय युतीची घोषणा नाही म्हणजे नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली जागावाटपाची बोलणी अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा रखडली आहेत.  नेमक्या कोणत्या जागांबाबत चर्चा पूर्ण होऊ शकेल की नाही हे सुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे युतीचे त्रांगडे कायम आहे.