आदित्यच्या रुपाने सेनेचं 'सूर्ययान' ६ व्या मजल्यावर उतरणार- संजय राऊत

 शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार या घोषणेवर राऊत यांनी यावेळी शिकामोर्तब केले. 

Updated: Sep 30, 2019, 06:14 PM IST
आदित्यच्या रुपाने सेनेचं 'सूर्ययान' ६ व्या मजल्यावर उतरणार- संजय राऊत  title=

मुंबई : काही दिवसांपुर्वी काही कारणामुळे चांद्रयान चंद्रावर उतरू शकले नाही पण शिवसेनेचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार या घोषणेवर राऊत यांनी यावेळी शिकामोर्तब केले. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या खांद्यावर घेतली यासाठी महाराष्ट्र आपला आभारी असल्याचे ते म्हणाले. 

शिवसेनेची स्थापना करण्याआधी आपण राजकारणात उतरणार नाही असे बाळासाहेबांना वाटायचे पण समाज सुधारायचा असेल तर समाजात उतरावे लागेल. इतिहास घडवताना नियम बाजुला ठेवायचे असतात असेही राऊत यावेळी म्हणाले. 

महत्त्वाचे मुद्दे 

- आदित्य देशाचे नेते झालेत, सगळं राजकारण आता माताेश्रीच्या भाेवती क्रेंद्रीत झालंय
- बाळासाहेबांनीही पूर्वी ठरवलं हाेतं की राजकारणात उतरणार नाही, पण समाजाच्या विकासासाठी तेही राजकारणात उतरले. याला पुढं नेण्याचे काम आदित्य करेल
- ट्रम्पही प्रचारासाठी येतील तुमच्या..मग हाऊडी आदित्य घोषणा देतील
- राज्याचे नेतृत्व करायला हवं तुम्ही
- महाराष्ट्रात ठिणगी पडली तर देशात तो विचार जातो, तसं तुम्ही आज ठिणगी टाकलीय
- जनतेच्या ताकदीनं तुम्हाला राजकारणात खेचून आणलंय
- मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरून तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. महालक्ष्मी येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, मला अनेकदा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राची सेवा कशी करता येईल, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे आता मला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. तेव्हा सर्व शिवसैनिकांच्या परवानगीने आणि साक्षीने मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.