सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Updated: Jul 25, 2019, 07:15 AM IST
सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार  title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जनआशीर्वाद दौरा सुरु असून ते राज्य पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांवर धक्कातंत्रही अवलंबण्यात येत आहे. शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासह मुंबईतील कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार आहेत. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. सचिन आहिर यांना मानणाऱ्या गटालाही यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत आधीच बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.