मुंबई : मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.
मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी (Zero Prescription Policy) देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात (Aapla Davakhana) मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झालं. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत 226 ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.
आपला दवाखाना योजना काय आहे?
'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही मुंबई महानगरपालिकेची योजना आहे. याअंतर्गत मुंबईकरांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातात. 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक भागात आपला दवाखाना असावा अशी योजना आहे. शासकीय रुग्णांवरील ताण कमी करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना उपयोगी ठरतेय. यात 147 प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामुल्य केल्या जातात.
प्रत्येक आपला दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक नर्स, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात आलीय..ग्रामीण भागात एसटी स्थानकाजवळ 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू करण्याची सरकारची योजना आहे. काही ठिकाणी पोर्टकेबिनमध्ये हा दवाखाना सुरू केला जाणार आहे.