मराठी की भोजपुरी गाणं? मुंबईतील पार्टीत दोन गटात तुफान राडा; एकाचा मृत्यू

Mumbai Crime: मुंबईत नववर्षाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत मराठी गाणं लावायचं की भोजपुरी यावरुन तुफान राडा झाला.   

शिवराज यादव | Updated: Jan 3, 2025, 01:06 PM IST
मराठी की भोजपुरी गाणं? मुंबईतील पार्टीत दोन गटात तुफान राडा; एकाचा मृत्यू title=

Mumbai Crime News: मिरा रोडमध्ये नववर्षाच्या पार्टीत तुफान राडा झाला. मराठी गाणं लावायचं की भोजपुरी गाणं यावरुन दोन गट आपापसात भिडले. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीला म्हाडा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री 3 वाजता ही घटना घडली. नवीन वर्षं साजरं केलं जात असताना तिथे मराठी गाणी वाजवली जात होती. यावेळी दुसऱ्या गटाने तिथे भोजपुरी गाणी वाजवण्याचा आग्रह केला. 

मराठी गाणं लावायचं की भोजपुरी यावरुन दोन गटात मोठा वाद झाला. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला. पण काही वेळातच या वादाने हाणामारीचं रुप घेतलं. हाणामारी करताना दोन्ही गटातील लोकांनी बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर केला. 

या हाणामारीत 23 वर्षीय राजा पेरियार याचा मृत्यू झाला. काशिमीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा पेरियार याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान विपुल राय नावाचा तरुण गंभीर जखमी आहे. त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान राजा पेरियारचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी याप्रकरणी आशिष जाधव आणि त्याचे नातेवाईक अमित जाधव, प्रकाश जाधव आणि प्रमोद यादव यांना राजा पेरियारला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. 

दरम्यान मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, रस्त्यावर वाहन चालवताना नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने तब्बल 89 लाख रुपयांची वाहतूक चलन जारी करण्यात आली. एकूण 17 हजार 800 वाहतूक गुन्ह्यांसाठी ई-चलान जारी करण्यात आले. 

दरम्यान, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल तक्रार केल्याने दिल्लीतील एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. 40 वर्षीय धर्मेंद्र यांचे नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरुन शेजाऱ्यांशी भांडण झाले. पोलिसांनी सांगितले की, धर्मेंद्रने गाण्यांबाबत तक्रार केली असता त्यांनी त्याला मारहाण केली.