Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणी 25 दिवसांपासून फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलीये.. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. काल सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघाला कोर्टासमोर हजर केला असता त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर याच अगोदर अटकेत असलेले इतर आरोपी आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे शहाणा हो. नाहीतर आमचे लोकं तुला अडकवतील.ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं त्यांच्यावर तू पलटलास अशा शब्दात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री साहेब आवरा यांना नाहीतर आम्हीं थांबणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रतिमोर्चे काढले तर आम्हीं देखील तसंच उत्तर देवू. आम्हींदेखील मोर्चाने उत्तर देवू, असे जरांगे म्हणाले. महाराष्ट्रात एक क्रूर हत्या केली गेली. यांना राज्य कुठं न्यायचं आहे? आम्ही मराठे राज्यभर मोर्चे काढू, असे जरांगे म्हणाले. संतोष देशमुख यांचा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. अजून बोललो नाही पण आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे.
तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे, असे जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. हे लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या.आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत? हे इकडे पळून आले आहेत. मुंडेंनी हे सगळं थांबवावे, असे ते म्हणाले.
लक्ष्मण हाकेंना मी कधीही विरोधक मानलं नाही.मी त्यांच्या कुठल्याच जातीवर बोललो नाही, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. कधी, कुठं यायचं ते जरांगेंनी सांगावं, आव्हान हाकेंनी केलंय. काल परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला. तर जरांगे चिथावणीखोर वक्तव्य करतायेत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी हाकेंनी केलीय.