मुंबई : 'किरिट सोमय्या यांच्या कार्यालयातही मला चहा प्यायला जायचं आहे. त्यांच्या कार्यालयाबाबत मला बरंच काही समजले आहे. मला भेट देवून पाहणी करायची आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजप नेते किरिट सोमय्यांवर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी वांद्र्यात म्हाडाची जागा बळकावून कार्यालय उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याला अनिल परबांनी उत्तर दिलं आहे.
अनिल परब यावेळी म्हणाले की,' किरिट सोमय्यांच्या कार्यालयाची कागदपत्र मला ही मिळाली आहेत. मी पण त्यांच्या कार्यालयात जाणार आहे चहा प्यायला . तुम्हा सगळ्यांना म्हणजे पत्रकारांना घेऊन जाणार, उद्या ते काही बोलायला नको.'
किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या यांनी म्हटले की, मी आज अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयाला भेट दिली. म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत त्यांनी कार्यालय थाटले आहे. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मग सरकार अनिल परब यांना वेगळा न्याय का लावत आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
याशिवाय, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या कंपनीसाठी जागा बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ही जागा समाजकल्याण केंद्र आणि झोडपट्टी पुनवर्सन यंत्रणेची SRA आहे. SRA ने देखील ही बाब मान्य केली आहे. महापौरांच्या या कार्यालयाच्या पत्त्यावर आणखी आठ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांविरोधात आपण सक्तवसुली संचलनालयाकडे ED तक्रार करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.