मुंबई: कोरोनाच्या काळात राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. मात्र, राज्य सरकार त्यांच्याबाबतची स्वत:ची जबाबदारी कशी विसरते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे.
या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली त्याने मात्र माझं मन विषण्ण झाले.
'आता कोंडीत सापडल्यावर राऊतांना राज ठाकरेंची आठवण आली का?'
खासगी सेवेतील डॉक्टरचा कोरोना काळात सेवा देताना कोव्हीडमुळे मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे आणि कारण पुढे केलं जात आहे की डॉक्टर ‘खासगी’सेवेत होता. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर ह्या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? ह्याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? हे चूक असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.