मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची (Andheri By Election 2022) मतदानप्रक्रिया (Voting) पार पडली आहे. अंधेरीकरांनी पोटनिवडुकीला अल्प प्रतिसाद दिला आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 उमेदवार होते. या उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत कैद झालंय. या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Poll) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 32 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालं आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. (andheri east assembly constituency by election 2022 total voting 31 74 percent)
मतदान प्रकियेला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. संपूर्ण अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 256 केंद्रावर या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. या पोटनिवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही, तर देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच या पोटनिवडणुकीसाठी शासकीय सुट्टीही जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही 11 तासांच्या कालावधीत एकूण 31.74 टक्केच मतदान झालंय.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसार माध्यम कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 2 लाख 71 हजार 502 मतदार आहेत. तसेच एकूण 31.74 टक्केच मतदान झालंय. या आकडेवारीनुसार या पोटनिवडणुकीत जवळपास अंदाजे 87 हजार जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय.
वाढत्या राजकीय दबावानंतर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी घ्यावी लागली. त्यानंतर भाजप आणि मुरजी पटेल समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून आलं. मात्र काही नाराज समर्थक आम्ही आमची नाराजी नोटामधून दाखवून देऊ असे म्हणाले होते. तसेच मतदारसंघातील अनेक भागात मतदारांना नोटा दाबण्यासाठी नोटा वाटण्यात आल्याची तक्रारही महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दाखल केली.
दरम्यान आता 6 नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीच्या निकालात विजेता कोण होतं, याकडे अंधेरीकर मतदारांचं आणि 7 उमेदवारांचं लक्ष लागून राहिलं आहे.