Rutuja Latke : ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत उच्च न्यायलयाचे महत्त्वाचे आदेश

ऋतुजा लटके (Rutuja Latke) या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. 

Updated: Oct 13, 2022, 04:33 PM IST
Rutuja Latke : ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत उच्च न्यायलयाचे महत्त्वाचे आदेश title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri By Election 2022) दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पहायला मिळतायेत. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ऋतुजा लटकेंचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11  वाजेपर्यंत मंजूर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  ऋतुजा लटके यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून (SSUBT) निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया
न्यायालयाच्या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला आशा होती मी पालिक कर्मचारी असल्याने पालिकेतून सहकार्य मिळेल मात्र तसे झाले नाही. म्हणून आज मला कोर्टात धाव घ्यावी लागली. माझा विरोधीत जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांनी केले त्यांना मी ओळखत नाही.  मात्र मी राजीनामा दिल्यानंतर माझावर कुठलेही आरोप नाही कोणतीही चौकशी माझावर सुरू नाही असे पत्र मला पालिकेने दिलेले आहे. मला विश्वास होता कोर्टावर...., असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

हायकोर्टात तातडीची सुनावणी
ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. तसंच त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं. याविरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका केली. त्यावर आज तातडीची सुनावणी घेण्यात आली. 

ऋतुजा लटकेंच्या वकिलांचा युक्तीवाद
ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. ऋतुजा लटके यांनी 2 सप्टेंबरला राजीनामा दिला. त्यानंतर 29 सप्टेंबरला त्यांचा राजीनामा फेटळण्यात आला. 3 ऑक्टोबरला अंधेरी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी नियमांनुसार राजीनामा सुपूर्द केल्याचा युक्तावीद त्यांच्या वकिलांनी केला. तसंच एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार जमा करावा लागतो, त्यानुसार एक महिन्याचा पगार पालिकेच्या कोषागरात जमा केल्याचंही लटके यांच्या वकिलांनी सांगितलं.