अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय

Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 15, 2023, 11:25 AM IST
अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय title=

Anant Chaturdashi And Eid: अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने पोलिसांवरी ताण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त काढण्यात येणारे जुलूस दुसऱ्या दिवशी काढावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले होते. या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ईद ए मिलादचा जुलूस गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत नाशिक येथील मुस्लिम बांधवांनीदेखील असाच निर्णय घेतला आहे.  मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे पोलीस तसेच गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत केले जात आहे.

ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधवांमध्ये बैठकी झाली. यावेळी यावेळी परिमंडळ १मधील सहायक पोलिस आयुक्त व सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकदेखील उपस्थित होते.

पोलिसांचे आवाहन

मुस्लिम समाजाने जुलूस 28 सप्टेंबरऐवजी 29 सप्टेंबरला काढावा, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले. या आवाहनला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही सण साजरे करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले. मुस्लिम एकता फाउंडेशनचे आलम बाबा,  सुन्नी जमियात उल्मा  आणि उम्मीद वेल्फेअर फाउंडेशनचे मिराज शहा हे या बैठकीला उपस्थित होते. तर गणेश मंडळ प्रतिनिधी म्हणून माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत आणि मनपा उपायुक्त श्रीराम पवारदेखील उपस्थित होते. 

नाशकातही निर्णय 

यंदा गणेश विसर्जन आणि प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम सौहार्द पूर्ण साजरे व्हावे , हिंदू - मुस्लिम सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात पोलीस स्थानकात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाशिकच्या नांदगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला.त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ईद-ए-मिलाद नबी जुलुस दुसऱ्या दिवशी काढण्यात येणार आहे.पोलीस स्थानकात झालेल्या मुस्लिम बांधवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे.मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे हिंदू बांधवांकडूनही स्वागत केले जात आहे.