मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. महाविकासआघाडीच्या सोमवारी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे घटकपक्ष रुसून बसल्याचे समजते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, सिपीएम, बहुजन विकास आघाडी, प्रहार यांचा समावेश आहे.
ठाकरे सरकारमध्ये 'या' आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराच्या कोणत्याही बैठकीला न बोलवल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाराज असल्याचे समजते. उद्या विधिमंडळाच्या प्रांगणात महाविकासआघाडीच्या ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ ( १० कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ (१० कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) आणि काँग्रेसचे १० (८ कॅबिनेट+ २ राज्यमंत्री) आमदारांचा समावेश आहे. परंतु, शेतकरी नेते बच्चू कडू वगळता घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे घटकपक्ष महाविकासआघाडीच्या नेत्यांवर नाराज झाले आहेत.
महाविकासआघाडी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी
यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. कर्जमाफीसाठी दोन लाखांचा निकष लावण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. केवळ अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून केलेली कर्जमाफी ही चुकीचा निर्णय ठरेल. या कर्जमाफीची एकूण रक्कम ७ ते ८ हजार कोटीच्या वर जाणार नाही. मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी आहे? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला होता.