मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकासाबरोबर परवडणारी घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर.

Updated: Dec 5, 2019, 09:08 PM IST
मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकासाबरोबर परवडणारी घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  title=
मुंबई महापालिकेत बैठक घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर.

मुंबई : शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर, पूर नियंत्रण आणि हवामान बदल, MMRDA आणि SRA मधील समन्वय प्रकरणे याबाबत सकारात्मक चर्चा करून नियोजनात्मक निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महापालिकेतील बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई

मुंबईचे मुख्यमंत्री अशी ओळख उद्धव ठाकरे यांची झाली आहे. आता ते मुंबईसाठी खास मिशन आखत आहेत. काय आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई. या मिशन मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी महापालिकेत चार तास बैठक घेतली. मुंबईबद्दल काय ठरवलंय उद्धव ठाकरेंनी? मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत तब्बल चार तास आढावा घेतला.

परवडणारी घरे आणि २४ तास पाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्हिजन २०३० चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबईत पर्यटनाला चालना देण्याबरोबर विविध पायभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. नव्या झोपड्यांवर नियंत्रण ठेवून परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील खड्डे यापुढे न दिसण्यासाठी खड्डे मुक्त रस्ते तर मुंबईकरांना २४ तास पाणी देण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विषयांवरील चित्रफितीचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या चित्रफितीमध्ये काम केलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बैठकीतील ठळकबाबी :

- मुंबईत पर्यटनाला चालना देणार 
- वॅक्स म्युझियम, ३ एकर जागेत आधुनिक अँक्वेरियम
- नॅशनल पार्कमध्ये नाईट सफारी
- नव्या झोपड्यांवर नियंत्रण ठेवणार
- शहरात परवडणारी घरे उपलब्ध करून देणे
- पायाभूत सुविधा अधिकाधिक मजबूत करणे
- खड्डे मुक्त रस्ते, २४ तास पाणी देणे
- पीएपी निर्माण करणार
- हवामान लहरीतील बदल आणि पूरनियंत्रण