मुंबई: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत अचानकपणे भाजपच्या गोटात दाखल झालेल्या अजित पवार यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केल्यानंतरही अजित पवार या सगळ्या घडामोडींसंदर्भात खुलून बोलत नव्हते. गेल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना हजेरी लावली असली त्यांचे मौन पाहून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. मात्र, गुरुवारी 'झी २४ तास'शी संवाद साधताना अजितदादा पहिल्यांदाच दिलखुलासपणे हसले.
'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनीनी अजित पवार यांना राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल आहे का, असा प्रश्न विचारला. तसेच तुमच्या चेहऱ्यावर आज बऱ्याच दिवसांनी हसू दिसत असल्याचे पत्रकाराने म्हटले. यावर अजितदादांनी आपले हसू आवरत म्हटले की, मी हसलो की तुम्ही म्हणता दादा हसतात, मी शांत बसलो तर तुम्ही म्हणता दादा नाराज आहेत. आता मी नेमके वागू तरी कसे, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी विचारला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे 'ऑल इज वेल' आहे. आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पवार साहेब चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान आज शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. आज मुख्यमंत्री आणि ६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. शिवसेना, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोघेजण शपथ घेतील. राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.